Parli Assembly Constituency: परळी विधानसभा: शरद पवारांची खेळी यशस्वी होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडमधील परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. २००९ साली गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची लेक पकंजा मुंडे यांनी परळीचे नेतृत्व केले. दोन टर्म आमदार राहिल्यानंतर २०१९ साली धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळविला. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर आहेत. पकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वितुष्टही संपले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोर मुंडे घराण्याचा उमेदवार नसेल. पण धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या डावपेचांचा मात्र सामना करावा लागणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी असलेले बजरंग सोनवणे यांना बाजूला काढून उमेदवारी दिली आणि त्यांना जिंकूनही आणले. आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्याकडून असाच एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे.

परळी विधानसभेचा इतिहास
परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाल्यापासून याठिकाणी कमळ चिन्हाचा उमेदवार निवडणूक लढवत आला होता. मात्र चाळीस वर्षांमध्ये प्रथमच परळीत कमळ चिन्हाचा उमेदवार नसेल. १९७८ मध्ये भाजपची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे १९८० पासून परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने कमळ चिन्ह रुजले. तत्पूर्वी हा मतदारसंघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. लातूर ग्रामीणचा काही भाग त्याला जोडलेला होता. या मतदारसंघातील रचनेमुळे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील मैत्र जुळलेले होते. १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. ते एकदाच पराभूत झाले. १९८५ मध्ये पंडित अण्णा दौंड या काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर १९९०, १९९५ , १९९९, २००४ पर्यत गोपीनाथ मुंडे विजयी होत राहिले. २००९ च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *