Bopdev Ghat Case: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपी २५ ते ३० वयोगटातील; शोधण्यासाठी स्केचही तयार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांचे स्केच तयार केले आहे. आरोपी हे २५ ते ३० वयोगटातील असून ते मरोठी बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी २५ पथकं तयार केली आहेत. या घटनेला आठवडा झाला तरी देखील पुणे पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले नाही. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपींना लवकरात अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांकडून तीन संशयित आरोपींचे वर्णन करण्यात आले आहे. आरोपींपैकी एका तरुणाचे वय सुमारे २५ वर्षे असून त्याचा वर्ण सावळा, मध्यम बांधा आहे. घटनेच्या वेळी त्याने जिन्स पँट, शर्ट, पायात चप्पल आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि तो मराठीमध्ये बोलत होता. दुसऱ्या आरोपीचे वय सुमारे ३० वर्षे असून वर्ण सावळा आहे. त्याने जिन्स पँट, पूर्ण बाह्यांचा शर्ट, करड्या रंगाचे स्वेटर परिधान केले होते. दाढी आणि मिशी वाढलेली असून तो हिंदी भाषा बोलत होता.

तिसऱ्या आरोपीचे वय सुमारे २५ वर्षे आहे. वर्ण सावळा आहे. त्याने जिन्स पँट, लेदरचे जॅकेट परिधान केले होते आणित्याची बोलीभाषा मराठी आहे. आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आरोपींबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी बोपदेव घाटात यापूर्वी लूटमार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. गुन्हे शाखेसह पोलिसांच्या २५ पथकांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात सुरूवात केली आहे.

दरम्यान, कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. पीडित तरूणी आणि तिच्या मित्राला मारहाण करत आरोपींने हे निर्दयी कृत्य केले. कोयता, चाकू आणि लाकडी काठीने त्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. तरुणीकडील दागिणे काढून घेतले. पीडित तरुणीच्या मित्राचे हात-पाय बांधून त्याच्यासमोरच तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *