महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या कामगारांना दिवाळी सणासाठी मासिक वेतन आणि बोनस दिवाळीपुर्वी अदा करण्यात यावा, तसेच विहित वेळेत बोनस अदा न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबतचे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी निर्गमित केले आहे.
भारतीय संस्कृतीत दिवाळी या सणाला महत्वपूर्ण स्थान असून देशभरासह जगभरात हा सण भारतीय नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवाळी सणानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांना बोनस देण्यात येते. त्यानुसार बोनस कायदा १९६५ च्या अधीन राहून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर तसेच मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील बोनस २४ ऑक्टोबर २०२४ पूर्वी बोनस अदा करण्यात यावा. याबाबत सर्व विभागप्रमुखांनी कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल कामगार कल्याण विभागास सादर करावा. तसेच बोनस अदा करण्याची कार्यवाही न करणाऱ्या संबंधीत विभागप्रमुख किंवा कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीने तसेच मानधनावर कामगार नियुक्त केले जातात. या कामगारांना कामगार कायद्यानुसार मासिक वेतन किंवा मानधन महिन्याच्या १० तारखेपूर्वी अदा करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत १ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होत असल्याने महापालिकेमध्ये मानधनावर आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगारांना दिवाळीपुर्वी वेतन आणि बोनस अदा करावे. ज्यामुळे महापालिकेमध्ये मानधनावर आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांची दिवाळी उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडेल.