महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑक्टोबर ।। देशातील ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण श्री. रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गजांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
सकाळी १० पासून अंतिमदर्शन..
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे दुःखद निधन झाले. रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर बुधवारी रात्रीच त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. सध्या रतन टाटा यांचे पार्थिव हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
शासकीय इतमातात होणार अंत्यसंस्कार
एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत.