![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑक्टोबर ।। राज्यभरात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन ते दिवस मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार?
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)जारी केला आहे. यासोबतच अहमदनगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.
दरम्यान काल पुणे शहर आणि परिसरासह राज्यातील अनेक भागांमधे पाऊस झाला. आज देखील राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबर हीटच्या काळात पाऊस झाल्याने तापमानात घट होऊन उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असलेल्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.