महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता.
मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली आहे. आयुष प्रदीप तयाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हडपसर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपीने मद्यपान करत कार चालवली असल्याचा संशय पोलिसांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आयुष हा सुसाट वेगाने कार चालवत होता.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो शहरातील एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे निघाला. यावेळी कारचालकाने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून तिघेजण प्रवास करीत होते. अपघातात त्यांना किरकोळ मार लागला. आरोपीने घटनास्थळावर न थांबता सुसाट वेगात कार दामटवली.
त्यानंतर पुढे गुगल बिल्डींग समोर दुचाकीस्वार रुउफ अकबर शेख यास पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारची धडक बसताच रऊफ हा दुचाकीसह दूर फेकला गेला. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी नोबल हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. मात्र, उपचारापूर्वीच रउफ याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता.
पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही तपासत कारचा क्रमांक प्राप्त केला. आरोपीला मध्यरात्री हडपसर येथून अटक करण्यात आली आहे. अपघात झाला तेव्हा आरोपीने मद्यपान केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास सुरु आहे. पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.