Heavy Rain Alert : पुण्या मुंबईसह १४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ; आज पुन्हा कोसळणार परतीचा पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। परतीच्या पावसाने महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबई, पुणे ठाण्यासह पालघर आणि कोकणात गुरुवारी (ता. १०) जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. दुसरीकडे पावसाने दांडिया आणि गरब्याचा देखील खेळ बिघडवला. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे या विभागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे, मुंबई, नवी मुंबईसह पालघर, ठाण्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले असून गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय झाले आहे.

परिणामी वायव्येकडे जाताना या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.परिणामी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *