महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर ।। दसरा मेळाव्यानिमित्त आज राज्यात राजकीय धुराळा उडणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गट तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीज जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. दुसरीकडे नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव पार पडणार आहे. त्यामुळे कोणाच्या मेळाव्याला सर्वात जास्त गर्दी जमणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
विशेष बाब म्हणजे, या दसरा मेळाव्यांमधून विधानसभेचं रणशिंग फुंकले जाणार आहे. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देखील राजकीय भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यांना विशेष महत्व प्राप्त झालं आहे. बीडमधील दोन्ही दसरा मेळावे दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे.
जरांगे यांचा नारायण गडावरील तब्बल ९०० एकरवर दसरा मेळावा होत आहे. तर पंकजा मुंडे यांचा मेळावा भगवानगडावर होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्क मैदानात होईल, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे साडेपाच वाजता होत आहे.
video
या मेळाव्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, आझाद मैदानात होणाऱ्या मेळाव्याला एक ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा शिंदेसेनेने केला आहे. तर शिवतीर्थावरील मेळावा गर्दीचा उच्चांक मोडणारा असेल, असा विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील तोफ धडाडणार आहे.
राज ठाकरे हे दसऱ्यानिमित्त आज सकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. पहिल्यांदाच ते पॉडकास्टवरून बोलणार आहेत. त्यामुळे मनसैनिकांना राज ठाकरे काय संदेश देणार, हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे, शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याआधी राज ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करणार आहे. त्यामुळे ते कुठल्या विषयाला हात घालतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.