![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर ।। सलग दोन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज शनिवार (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई पुण्यासह घाटमाथ्यावर देखील विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मौसमी वाऱ्यांची चाल थबकली. त्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ३५ अंशाचा पार गेला. उन्हाच्या झळा बसत असल्याने प्रचंड उकाडा जाणवू लागला.
मात्र, मौसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच आज दसऱ्याच्या दिवशी पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
11 Oct, 11 pm, possibility of mod thunderstorm over North Raigad, NM, parts of Thane & Mumbai during next 2,3 hrs at isolated places as seen from latest radar obs from Mumbai.
Widespread light to mod rains past 1 hr. pic.twitter.com/9GINGWlKEg— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2024
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट आहे.
दुसरीकडे जालना, बीड विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात तुफान पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, सातारा, कोल्हापूरमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.