महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर ।। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. राज्यातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, सोमवारी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. 
2019 विधानसभा निवडणुकीपेक्षा आताची परिस्थिती वेगळी आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे भाजपसोबत होते, तर अजित पवार (Ajit Pawar) हे काँग्रेससोबत (Congress) होते. पण मागील चार वर्षांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. आधी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत (BJP) फारकत घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. पण त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी मविआ आणि महायुती यांच्यामध्ये लढत होणार आहे. युती आणि आघाडीचे जागावाटप आता जवळपास पूर्ण झाल्याचं बोललं जातेय. पण कोण किती जागांवर लढणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (Elections to be held before November 26)
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीचं जागावाटप होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. त्याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन ते तीन दिवसांत जागावाटप पूर्ण होईल, असे संकेत दिले होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपचा फॉर्म्युला ठरलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १२६, शिंदे गट ९० आणि अजित पवार गट ७२ जागांवर लढण्याची शक्यता आहे.
भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी राज्य विधानसभेच्या २८८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत एकमत झाले आहे. दिल्लीतील भाजप नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बोलणी करून अंतिम घोषणा दोन दिवसात होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मविआत कोण सर्वाधिक जागा लढणार?
महाविकास आघाडीचं जागावाटपही जवळपास पूर्ण झाले आहे. २८८ पैकी २२० जागांवर तिन्ही पक्षाचे एकमत झालेय. विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर पेच आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये बैठका सुरु आहेत. पुढील काही दिवसांत याचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर ठाकरे आणि शरद पवार यांनाही सन्मानजनक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस ११०, ठाकरे ९० ते १०० आणि शरद पवार ८० ते ८५ जागा लढवण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली आहे. पुढील आठवड्यात जागावाटपाबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
यंदा राज्यात निवडणुका कधी ?
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याचा दौरा केला होता. महायुती आणि मविआच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठका घेतल्या होत्या. त्याशिवाय निवडणूक घेण्याची तयारी कसा असेल, याचाही आढावा घेतला होता. सोमवार अथवा मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. त्यादिवसांपासून आचारसंहिता लागू शकते. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानुसार, राज्यात दोन टप्प्यातही निवडणुका होऊ शकतात.