महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून तोडफोड बॅटींग पाहायला मिळाली. जो फलंदाज फलंदाजी करण्यासाठी यायचा, तो पहिल्या चेंडूपासूनच बांगलादेशविरुद्ध हल्लाबोल करत होता.
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि रियान पराग यांनी तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या बळावर भारताने २९७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला अवघ्या १६४ धावा करता आल्या. दरम्यान भारतीय संघाच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
या यादीत भारतीय संघ पोहोचला नंबर १ स्थानी
या सामन्यात आधी भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजही चमकले. या शानदार विजयासह भारतीय संघाने बांगलादेश ३-० ने सुपडा साफ केला. २०० धावांचा पल्ला गाठताच भारतीय संघाने इतिहास रचला.
भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ३७ वेळेस २०० धावांचा पल्ला गाठला आहे. तर समरसेटचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने ३६ वेळेस हा कारनामा केला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने हा कारनामा ३५ वेळेस केला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ३३ वेळेस हा कारनामा करुन दाखवला आहे. जगभरातील संघांना मागे सोडत आता भारतीय संघाने अव्वल स्थानी कब्जा केला आहे.
पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० धावांचा पल्ला गाठणारे संघ
३७ वेळेस- भारतीय संघ
३६ वेळेस – समरसेट
३५ वेळेस – चेन्नई सुपर किंग्ज
३३ वेळेस – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
३१ वेळेस – यॉर्कशायर
भारतीय संघाची दमदार कामगिरी
गेल्या काही वर्षात भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलंय. मुख्य बाब म्हणजे २०२४ मध्ये भारतीय संघाने ६ वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला आहे.