Baba Siddique Death: …… एक फोन आला आणि ते पुन्हा ऑफिसमध्ये गेले ,झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर येथे शनिवारी रात्री त्यांच्यावर तीन आरोपींकडून सहा गोळ्यात झाडण्यात आल्या. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. तर, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी या हल्ल्यात थोडक्यात वाचला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांना या दोघांनाही संपवायचं होतं. पण, झिशान हे या हल्ल्यात थोडक्यात वाचले.


शनिवारी संध्याकाळी बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील निर्मलनगर येथे त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यावेळी झिशानही त्यांच्यासोबत होते. फटाके फोडल्यानंतर बाबा सिद्दीकी हे घरी जाणार होते. त्यासाठी रात्री नऊ-सव्वानऊच्या सुमारास हे ऑफिसच्या बाहेर पडले. फटाके वाजवत असतानाच तिथे एक गाडी आली आणि त्यातून तिघे खाली उतरले. रुमालाने चेहरा झाकलेल्या या तिघांनी गाडीतून उतरताच सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना सहा गोळ्या मारण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत लागली आणि सिद्दीकी तिथेच कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालायात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

यावेळी झिशान सिद्दीकी हे वडिलांसोबतच घरी जाणार होते. त्यासाठी दोघेही ऑफिसबाहेर पडणार तेवढ्यात झिशान यांना एक फोन आला आणि ते पुन्हा ऑफिसमध्ये गेले. तिथे ते फोनवर बोलत असताना बाहेरुन गोळीबाराचा आवाज आला. झिशान बाहेर आले तेव्हा बाबा सिद्दीकी हे गोळ्या लागल्याने जमिनीवर कोसळलेले होते. जर, झिशान यांना तो फोन आला नसता तर कदाचित हल्लेखोरांनी त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या असत्या, असं सूत्रांनी सांगितलं आहे. १५ दिवसांपूर्वीत झिशान सिद्दीकी यांना धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना व्हाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.
बाबा सिद्दिकींवर गोळीबार, आरोपी हरियाणा व उत्तर प्रदेशचे; मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना आदेश

बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरु आहे. तसेच, पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतुसेही जप्त केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *