ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली- वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : तळेगाव दाभाडे, 13 ऑक्टोबर – नाणोली येथील ग्रामस्थांना वराळे व तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी गेले कित्येक वर्षे मारावा लागणारा सुमारे सात किलोमीटरचा वळसा आता वाचणार आहे. नाणोली व वराळे या गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) करण्यात आला.

नाणोली तर्फे चाकण या गावातील रहिवाशांना वराळे, तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी एमआयडीसी, आंबी मार्गे सुमारे सात किलोमीटरचा वळसा पडतो. ग्रामस्थांची ही गैरसोय दूर करण्यासाठी नाणोली व वराळे या दोन गावांना जोडणारा पूल आमदार शेळके यांनी मंजूर करून घेतला आहे. सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला तेव्हा ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.

आमदार शेळके म्हणाले की, वराळे-नाणोलीला जोडणारा पूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. आजही या गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना लांबून वळसा घालून यावे लागते. अखेर हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात पुलासह जोड रस्त्याच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आणि आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न सुटणार असून दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.

पुलाचे काम गतीने पूर्ण व्हावे यासाठी अधिकारी व ठेकेदार यांनी काळजी घ्यावी. इतक्या वर्षानंतर होणारा पूल दर्जेदार व्हावा यासाठी ग्रामस्थांनी देखील कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे, अशी सूचना आमदार शेळके यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमास पोपटराव लोंढे, शांताराम काळे, रामचंद्र जगताप, संतोष लोंढे, विशाल शिंदे, सरपंच सौ.मोनिकाताई शिंदे, प्राजक्ता राजगुरू, शुभांगी लोंढे, दत्तात्रय मखामले, चंद्रकांत लोंढे, भगवंत मराठे, तानाजी मराठे, शंकरराव मराठे, निलेश लोंढे, महादू लोंढे, चंद्रकांत दाभाडे, सुनील भोंगाडे, बबन मराठे, कामशेत सरपंच रुपेश गायकवाड, रमेश मराठे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *