Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा ; विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाबाबत बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका असून शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण जाणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसेल, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली असून आरक्षणावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.

रविवारी अकोला येथे भव्य धम्म प्रवर्तन दिनाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसींना उमेदवारीच द्यायची नाही हे प्रस्थापितांचे धोरण आहे. त्यामुळं ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे”.

“विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींची जनगणना करून त्यांचं शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण ठरवलं जाईल. तोपर्यंत आरक्षण थांबवलं जाईल. मात्र, वंचितला ओबीसी समाजाचे १०० उमेदवार निवडून आणायचे आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मतदान करा म्हणणारे आंबेडकरवादी, संविधानवादी आणि अधिकारी आहेत. मात्र, ते आरक्षणामुळे अधिकारी याचा त्यांना विसर पडला आहे”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्या ओबीसी समाज म्हणतोय की आमच्या ताटात मराठा समाज नको. तर दुसरीकडे मनोज जरांगे म्हणता आहे की, आम्ही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेणार. हा राजकीय आणि मतांचा संघर्ष आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींची जनगणना केली जाईल. त्यानंतर आरक्षणाला धोका असेल. ओबीसींचं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणही जाणार”, असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *