महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. या योजनेअंतर्गत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांनाही उपचार मिळतात. त्यानंतर आता सरकार लवकरच या योजनेत महत्त्वाचे बदल करणार आहे. आयुष्मान भारत योजनेत आरोग्यविषयक आणखी पॅकेज जोडण्याबाबत विचार करत आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ही सुधारित योजना या महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा होणार आहे. मोफत उपचार मिळण्यासोबतच त्यांना आरोग्य पॅकेजदेखील मिळणार आहे.
आरोग्य सुविधांविषयीच्या निधीबाबत निर्णय घेणारी समिती हे नवीन बदल करण्याच्या तयारीत आहे. वृद्ध लोकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन तरतुदींमध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे.सध्या या योजनेत तपासणी, शस्त्रक्रिय, कॅन्सर अशा २७ आरोग्य सुविधांचा समावेश आहे.
यात रुग्णालयातील सुविधांसह डिस्चार्ज झाल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीसाठी औषधे, इतर सुविधा, जेवण आणि निवास अशा सुविधा पुरवल्या जातात. सध्या ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत २९,६४८ रुग्णालयांचा समावेश आहे. त्यातील १२,९९६ ही खाजगी रुग्णालये आहेत. आयुष्मान भारत योजना ही राज्य व केंद्रशासित प्रदेशात योजना राबवण्यात आली आहे. (Ayushman Bharat Yojana)
७० वर्षांवरील सर्व व्यक्ती आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी पीएमजेएवाय पोर्टल किंवा आयुष्मान भारत अॅपवर जाऊन नोंदणी करावी लागेल. या योजनेत आयुष्मान कार्ड मिळते. हे कार्ड जर जुने झाले असेल तर नव्या कार्डसाठी अर्ज करावा लागेल.