“सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता…”; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारने शासन निर्णयांचा आणि विविध योजनांचा धडाका लावला आहे. त्यात आज महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर केल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयाचा फायदा बाहेरून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसोबतच मुंबईतून दररोज कामानिमित्त जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांनाही होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. फक्त या टोलमाफीतून अटल सेतू वगळण्यात आला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेली अनेक वर्षे टोलच्या मुद्द्यावरून आंदोलन केले आहे. मुंबईत दिवसागणिक असंख्य वाहने ये-जा करतात, त्यांना दिलासा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली होती. त्याच मागणीला आज यश आले. या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी एबीपीमाझाला प्रतिक्रिया दिली. “गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता. त्या लढ्याला आज यश आले. उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा. नाहीतर निवडणुकीच्या नंतर त्याचा बोजा जनतेच्या माथी येईल,” अशी रोखठोक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.

ट्विटच्या माध्यमातून मांडली सविस्तर भूमिका

“मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.

‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं विचारल्यावर…

पुढे राज ठाकरे लिहितात, “आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *