महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। पिंपरी-चिंचवड शहराला संत परंपरा आणि वारकरी सांप्रदायाची विशाल परंपरा आहे. आषाढी वारी पालखी सोहळा आणि वर्षभरात तीर्थक्षेत्र आळंदी येथे लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येतात. आळंदीतून दरवर्षी वैष्णवांचा मेळा पांडुरंगाच्या नामस्मरणाचा जयघोष करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करतो. या पालखी महामार्गावर वैष्णवांच्या भक्तीसोबत हिंदुत्वाचे भगवे निशान फडकले जावे, अशी संकल्पना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे .पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
त्यामुळे चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फुटी उंच भगवा ध्वज उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील लाखो वारकरी देहू-आळंदी-पंढरपूर पालखीमार्गावरून वारी करतात. या मार्गावर चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ संतसृष्टी उभारण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून या भक्ती मार्गावर वारकरी आणि हिंदू धर्माचे पवित्र निशाण असलेला भगवा ध्वज उभारावा, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय हिंदू संस्कृतीची माहिती सांगणारा तसेच त्याग, बलिदान व अभिमानाचे जाज्वल्य प्रतिक असलेला भगवा ध्वज थोरल्या पादूक मंदिर, चऱ्होली येथे उभारावा. त्याची उंची २०० फूट इतकी असावी, या कामाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. तसेच, निविदा प्रक्रिया राबण्यात येत असून, देहू-आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर थोरल्या पादुका मंदिरासमोर हा ध्वज उभारण्यात येत आहे.
हिंदूत्व आणि सनातन धर्माचे प्रतिक असलेला भगवा ध्वज उभारला जावा. यासाठी पालखी महामार्गावरील ठिकाण निश्चित करावे. या करिता शहरासह पुणे जिल्ह्यातील शिव-शंभू प्रेमीयांच्यासह हिंदूत्ववादी संघटनांकडून मागणी केली जात होती. भवना ध्वज त्याग-राष्ट्रभक्ती आणि समर्पण भावनेचे प्रतिक आहे. या मूल्यांची प्रेरणा समाजाला मिळावी. या करिता भव्य ध्वज उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्याला आता मूर्त स्वरुप मिळाले आहे.
गौरवशाली वैष्णव परंपरा जपणारे आमचे वारकरी भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हिंदू धर्म आणि भक्तीची महती सांगतात . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भगव्याच्या साक्षीने इतिहास घडविला. भारतीय संस्कृतीतील अनेक मोठ्या विजयांमध्ये भगवा ध्वज यशस्वीतेचे प्रतिक म्हणून उंचावला गेला. त्यामुळे स्वाभिमान, त्याग, भक्ती आणि शक्तीची स्फूर्ती देणारा हा ध्वज उभारला जाणार आहे. आपल्या परंपरा आणि इतिहास आपल्याला आदर्श मार्गांवरून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.