महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। रखडलेल्या राज्यपाल नामनियुक्त विधान परिषदेच्या १२ जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून यापैकी सात नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आल्याचे समजते. यामध्ये भाजपच्या चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील, मनीषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी आणि पंकज भुजबळ यांची वर्णी लागेल, असे कळते.
गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नामनियुक्त विधान परिषदेच्या १२ जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर १२ पैकी सात नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केल्याचे समजते.
कोणाकोणाची नावं?
या यादीत भाजपच्या चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरू महाराज राठोड, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील, मनीषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी आणि पंकज भुजबळ या नावांचा समावेश असल्याचे समजते.
सात जागांवर एकमत
विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असल्याने महायुती सरकारने विधान परिषदेत रिक्त असलेल्या राज्यपाल नामनियुक्त १२ जागांबाबत तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. महायुतीत १२ पैकी सात जागांवर एकमत होऊन भाजपला तीन आणि शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट प्रत्येकी दोन या सूत्रावर एकमत झाले आहे. त्यानुसार तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातील उमेदवारांची नावे निश्चित करून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्याची यादी राज्यपालांना सादर केल्याचे सांगण्यात आले.
