![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। : दिवाळी सुट्टीनिमित्त राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाने दिवाळी सुट्टीतील १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांचा यंदाचा दिवाळीतील एसटी प्रवास अतिरिक्त खर्चाशिवाय पूर्ण होणार आहे.
दिवाळीत गर्दी विभागण्यासाठी दरवर्षी महामंडळाकडून विविध उपाय राबवण्यात येतात. यात अतिरिक्त एसटी फेऱ्यांचे नियोजन, स्थानक-गाड्यांमध्ये स्वच्छता आणि हंगामी भाडेवाढ आदींचा समावेश असतो. दिवाळीतील सणासुदीच्या दिवसात नातेवाईकांकडे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. शाळांनाही मोठी सुट्टी असल्याने अनेक कुटुंबीय पर्यटनासाठी जातात. सोमवार, २८ ऑक्टोबरला वसुबारस ते रविवार २ नोव्हेंबर भाऊबीजदरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहे.
यंदा दिवाळी हंगामी भाडेवाढ २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान प्रस्तावित होती. ती रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे यंदाच्या उत्सवात कोणत्याही एसटी गाड्यांमधून जादा तिकीट भाडे आकारण्यात येणार नाही. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी काढले आहेत. दिवाळी सुट्टीतील गर्दी विभागण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या आणि वातानुकूलित नव्या बसगाड्या दाखल होत आहेत.
गर्दीचा हंगाम लक्षात घेता महामंडळाच्या सर्व कार्यशाळा आणि गाड्यांची दुरुस्ती करणाऱ्या विभागांना सज्ज ठेवण्यात आले आहेत. बसगाड्यांचे मार्गस्थ बिघाडाचे प्रकार टाळण्यासाठी गाड्यांची संपूर्ण तपासणी करूनच लांबच्या प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या रवाना करण्याच्या सूचना महामंडळाने सर्व विभागांना दिल्या आहेत.
