महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। मराठीसह हिंदी सिनेविश्वात लोकप्रिय भूमिका साकारणारा अवलिया अतुल परचुरे आज आपल्यात नाही. अतुल यांनी कर्करोगावर मात केली, त्यांनतर दणक्यात कमबॅकही केले. मात्र मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली. वयाच्या ५७व्या वर्षी अतुल यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळचा मित्र गमावल्याने मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. अतुल यांची अशी अचानक एक्झिट मनाला चटका लावून जाणारी ठरली.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ‘ऑल द बेस्ट’ या सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटातील ‘धोंडू जस्ट चिल्ल’ या संवाद खूप गाजला. आजही मित्रमैत्रिणींच्या टोळक्यामध्ये गंमत करताना संजय मिश्रा यांचा हा संवाद सर्रास वापरला जातो. या सिनेमात संजय ‘धोंडू’ असा उल्लेख अतुल यांच्या पात्रासाठी करायचे. बड्या स्टारची फौज असणाऱ्या या सिनेमात अतुल-संजय या जोडीने खळखळून हसवले. याच सिनेमाची आठवण संजय यांनी शेअर केली, यावेळी मात्र त्यांची पोस्ट चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली.
‘धोंडू जस्ट चिल्ल कोणाला म्हणू?’
संजय यांनी ‘धोंडू चिल्ल’चा सीन शेअर करत लिहिले की, ‘धोंडू एवढ्या लवकर निघून जाण्याची काय गरज होती… आता मी कोणाला म्हणू की जस्ट चिल्ल.’ संजय यांनी ट्विटर पोस्टमध्ये या सीनचा व्हिडिओही शेअर केला. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘ऑल द बेस्ट’सह त्यांनी ‘सलाम-ए-इश्क’, ‘खट्टा-मीठा’, ‘पार्टनर’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘ब्रेव्ह हार्ट’, ‘बिल्लू’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये परचुरेंनी काम केले आहे. अतुल यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये कॅन्सरचं निदान झाले होते. सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच याविषयी भाष्य केले. त्यांच्या लढ्याविषयी समजल्यानंतर मराठी प्रेक्षक हळहळला होता, मात्र त्यांनी ज्या हिंमतीने कमबॅक केले त्याचे कौतुकही झाले. झी मराठी नाट्य गौरवमध्ये त्यांनी सादर केलेली छोटीशी भूमिका असो किंवा रंगभूमीवर केलेले पुनरागमन, अतुल परचुरे यांनी अनेक नवख्या कलाकारांना आणि कॅन्सरशी लढणाऱ्यांना प्रेरणा दिली होती.