महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। सणासुदीत बदामाची मागणी वाढली आहे. यामुळे बाजारात बनावट आणि भेसळयुक्त बदाम विक्रीस येतात . बदामाचा रंग आणि चमक वाढवण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड आणि ब्लीचिंग एजंट्स सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करतात. या भेसळयुक्त बदामाचे सेवन केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. भेसळयुक्त बदाम तुमच्या आरोग्यासाठी कसे हानिकारक असू शकतात आणि तुम्ही घरीच खरे आणि नकली बदाम कसे ओळखू शकता हे जाणून घेऊ या.
भेसळ का केली जाते?
बदामात विविध प्रकारची भेसळ केली जाते. सणासुदीत बदामाची मागणी वाढली की अनेक व्यापारी निकृष्ट दर्जाचे बदाम विकतात. निकृष्ट दर्जाच्या बदामांमुळे पोटाच्या समस्या, त्वचेची अँलर्जी तसेच शरीरावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.
खराब बदाम खाल्यास होणारे वाईट परिणाम
हायड्रोजन पेरोक्साईड सारख्या रसायनांमुळे पोट आणि आतडेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसतात. निकृष्ट आणि कमी दर्जाच्या बदामांचे दीर्घकाळ सेवन केल्याने पचनसंबंधित गंभीर विकार होऊ शकतात. म्हणूनच असे बदाम खाणे टाळावे
रोगप्रतिकाशक्ती कमी होणे
खराब आणि कमी दर्जाचे बदाम खाल्ल्याने काही लोकांना रसायनांची ॲलर्जी होऊ शकते. यात खाज सुटणे आणि पुरळ उठणे यासारख्या सौम्य लक्षणांपासून ते ॲनाफिलेक्सिससारख्या गंभीर परिस्थितीपर्यंत लक्षणे असू शकतात. इतकेच नाही तर असे बदाम रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात.
घरीच खऱ्या बदामाची ओळख कशी कराल?
बदाम चांगले आहे की खराब हे ओळखण्यासाठी पाण्याचा वापर करावा. यासाठी पाण्यात ५ते ७ बदाम रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी बदाम पाण्यातून काढा आणि सोलून घ्या. नैसर्गिक बदामाची साल सहज निघते, खाली स्वच्छ, पांढरे बदाम दिसतात. पाण्याचा रंग तपासावा. जर ते स्वच्छ राहिले तर बदामात भेसळ नाही आणि पाण्याचा रंग तपकिरी झाला तर याचा अर्थ बदामात केमिकल वापरण्यात आले आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.