✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | २० डिसेंबर २०२५ | आतापर्यंत नगरसेवक व्हायचं असेल तर पक्ष, ताकद, प्रचार आणि आकडेमोड पुरेशी होती. मात्र आता निवडणूक आयोगाने थेट उमेदवारांच्या विचारांची, प्रामाणिकपणाची आणि विकासदृष्टीची परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना केवळ कागदपत्रेच नव्हे, तर शहर विकासावर स्वतःचा निबंधही सादर करावा लागणार आहे. ‘सत्ता हवी’ म्हणण्याआधी ‘करायचं काय?’ याचं उत्तर देण्याची वेळ आता उमेदवारांवर आली आहे.
निवडणूक आयोगाने १७ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार उमेदवारांना १०० ते ५०० शब्दांत निबंध लिहावा लागणार आहे. निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघात कोणत्या विकास योजना राबवणार, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक यांसारख्या प्रश्नांवर काय भूमिका असेल, याची स्पष्ट मांडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. थोडक्यात, फक्त घोषणा नाहीत तर लिखित विकासनामा द्यावा लागणार आहे.
इथेच आयोग थांबलेला नाही. ‘भ्रष्टाचार करणार नाही’ ही केवळ सभेतील घोषणा न राहता ती शपथपत्रात लिहून द्यावी लागणार आहे. उमेदवाराने स्वतः, त्याची पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असे शपथपूर्वक जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खोटं शपथपत्र दिलं तर उमेदवारीच अडचणीत येऊ शकते. म्हणजेच, विकासाची भाषा आणि चारित्र्याची हमी—दोन्ही एकाच अर्जात मागितली जाणार आहेत.
या निर्णयामुळे राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांचा प्रश्न आहे, निबंध लिहिणाऱ्यांमधून खरे विकासक निवडले जातील का? की हा फक्त औपचारिक कागद ठरेल? मात्र आयोगाचा रोख स्पष्ट आहे—नगरसेवक म्हणजे फक्त हात वर करणारा प्रतिनिधी नव्हे, तर विचार करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे.
दरम्यान, राज्यातील नगरपरिषद निवडणुकांची धामधूम सुरूच आहे. आज राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष व सदस्य तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यांसाठी मतदान होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे एकत्रित निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मतमोजणी सकाळी सुरू होऊन सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली.
१५ जानेवारीला होणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण आता निवडणूक म्हणजे केवळ जिंकण्याची लढाई नाही, तर विचार, विकास आणि विश्वासाची कसोटी बनली आहे. प्रश्न एकच—निबंधात लिहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार की पुन्हा फाईलमध्येच अडकणार?
