![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | २० डिसेंबर २०२५ | नव्या वर्षाची चाहूल लागताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची तयारी सुरू झाली आहे. २०२६ मध्ये पाऊल टाकताच बँकिंग नियमांत बदल होणार असून, त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. क्रेडिट कार्डचे शुल्क वाढणार, काही मोफत सुविधा बंद होणार आणि बँकेच्या दैनंदिन सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांच्या तोंडचा घास महागणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादा, अतिरिक्त शुल्क, चेकबुकसाठी आकारले जाणारे पैसे आणि क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्क वाढ यामुळे ग्राहक आधीच वैतागले आहेत. त्यातच आता नव्या वर्षात बँकांचा आणखी एक ‘दे धक्का’ बसणार आहे. काही बँका डिजिटल व्यवहारांवर नियंत्रण आणण्याच्या तयारीत असून, वॉलेट अॅप्स आणि क्रेडिट कार्ड वापरावर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला जात आहे.
यामध्ये आयसीआयसी बँकेने सर्वात आधी बदलांची घोषणा केली आहे. १५ जानेवारी २०२६ पासून क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या व्यवहारांवर थेट दोन टक्के शुल्क आकारले जाणार आहे. ऑनलाइन गेमिंगचा वाढता वापर लक्षात घेता, हा निर्णय अनेक ग्राहकांना महागात पडणार आहे. याशिवाय, अॅमेझॉन, पेटीएम, मोबिक्विकसारख्या थर्ड पार्टी वॉलेट अॅप्समध्ये पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास एक टक्का शुल्क द्यावे लागणार आहे.
बँकेच्या शाखेत जाऊन रोखीने क्रेडिट कार्डचे बिल भरणाऱ्यांसाठीही वाईट बातमी आहे. सध्या १०० रुपये असलेले हे शुल्क आता वाढवून १५० रुपये करण्यात येणार आहे. म्हणजेच ‘कॅश पेमेंट’ करणाऱ्यांना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. एवढ्यावरच न थांबता, इंस्टंट प्लॅटिनम कार्डवर बुक माय शोद्वारे मिळणारी मोफत चित्रपट तिकिटांची सवलतही १ फेब्रुवारी २०२६ पासून बंद होणार आहे.
काही क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे टाकल्यास आधीच १.५ टक्के सर्व्हिस चार्ज आकारला जात आहे. नव्या वर्षात अशा शुल्कांचा आवाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँकांच्या मते, सेवा खर्च आणि नियामक कारणांमुळे हे बदल आवश्यक आहेत; मात्र ग्राहकांच्या दृष्टीने हे बदल म्हणजे खिशावर वाढता ताणच आहे.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची भाषा एकीकडे सुरू असताना, त्याच व्यवहारांवर वाढते शुल्क लावणे हा विरोधाभास ठरत आहे. नव्या वर्षात बँकिंग ‘सुलभ’ होण्याऐवजी ‘महाग’ होणार, हीच वस्तुस्थिती आता समोर येत आहे.
