![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | २० डिसेंबर २०२५ | “डिसेंबर म्हणजे गुलाबी थंडी” हा समज यंदा पुणेकरांनी गुंडाळून ठेवावा, अशीच परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाल्याने पुणे शहरासह जिल्हा अक्षरशः गारठला आहे. पाषाणमध्ये तापमान सात अंशांच्या घरात घसरले असून, थंडीने पहाटेची वेळ हुडहुडी भरवणारी झाली आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यात किमान तापमान १० ते ११ अंशांपर्यंत गेल्याने थंडीचा जोर काहीसा ओसरल्याचे वाटत होते. मात्र, मागील ४८ तासांत परिस्थिती झपाट्याने बदलली. गुरुवारी ८ ते १० अंशांदरम्यान असलेले किमान तापमान शुक्रवारी थेट दोन ते तीन अंशांनी खाली घसरले आणि पुणेकरांना पुन्हा स्वेटर, मफलर आणि रजई बाहेर काढावी लागली.
शहरातील पाषाण येथे ७.७ अंश, शिवाजीनगरमध्ये ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बारामती ७.४, माळीण ७.७ आणि दौंडमध्ये ८ अंश तापमान नोंदवले गेले. हवामान कोरडे असल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवते आहे. पुढील दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील थंडीचा केंद्रबिंदू सध्या नाशिक जिल्हा ठरत आहे. निफाड येथे या हंगामातील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अवघ्या आठ दिवसांत किमान तापमानाचा पारा तब्बल चार अंशांहून अधिक घसरला आहे. नाशिक शहरातही तापमान ७.४ अंशांवर आले आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी झंझावातामुळे थंड वारे राज्याकडे झेपावत असून, त्यामुळे थंडी वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
महामुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान खाली येऊ लागले आहे. मंगळवारपर्यंत गारठा कायम राहण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमान थेट पाच अंशांपर्यंत उतरण्याचा अंदाज आहे. मात्र, २५ डिसेंबरनंतर हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तोपर्यंत, “थंडी गेली” असा निष्कर्ष काढण्याऐवजी गरम कपडे, गरम चहा आणि खबरदारी हाच पुणेकरांसह महाराष्ट्रवासीयांचा एकमेव आधार ठरणार आहे.
