महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। नवरात्र आणि दसरा सणांमध्ये अन्न व औषध विभागाने एकुण 38 आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये दुध, खवा, पनीर, स्वीट, मावा, तुप, बटर, नमकीन व भगर आदी 10 लाख 35 हजार 378 रूपये किंमतीचा भेसळयुक्त मालाचा साठा नुकताच जप्त करण्यात आला.
उत्सव काळात घरोघरी जेवणात पनीर आणि गोड पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र अधिक नफा कमविण्याच्या मोहापोटी काही आस्थापना चालक नागरिकांच्या जिवाशी खेळतात. भेसळयुक्त मालाची ठिकठिकाणी विक्री केली जाते.
म्हणून अन्न व औषध विभागाने पुणे जिल्ह्यासह विभागातील सोलापुर, कोल्हापुर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत आस्थापनांची तपासणी केली आणि धाडी घालून जप्ती केली. पुणे जिल्ह्यात 10 आस्थापनांची तपासणी करून सात लाख 460 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
तर पुणे विभागातील 28 आस्थापनांची तपासणी करून 3 लाख 34 हजार 918 रूपये किंमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन
शहरात आपल्या अवतीभौवती भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचे लक्षात आल्यास 1800222365 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.