महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर ।। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देताना आमच्या माणसांना त्याग करावा लागला, त्यामुळे आता जागा वाटपात झुकते माप घ्यावे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून केले होते. अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अमित शहा यांच्या या वक्तव्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. आम्ही आमदारक्या पणाला लावून गुवाहाटीला गेलो, म्हणून भाजपची सत्ता आली, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
महायुतीच्या जागावाटपबाबत अमित शहा यांनी भाजपच्या त्यागाची एकनाथ शिंदे यांना आठवण करून दिली होती. यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी सेना आमदारांच्या धाडसामुळे भाजपा सत्तेत आली, असा टोला भाजप नेत्यांना लगावला आहे. “भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला, हे खरे आहे. पण आम्ही धाडस केले. आमच्या आमदारक्या पणाला लावून गुवाहाटीला गेलो. म्हणून भाजपा सत्तेत आले. आम्ही धाडस केले नसते तर भाजपच्या त्यागाचे काय महत्व होते?” असा सवाल शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उपस्थित केला.
महायुतीचे बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावरुनही शहाजी बापू पाटील यांनी महत्वाचे विधान केले. “जरांगे पाटील यांना पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सकारात्मक चर्चा झाली असेल असा विश्वास आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला. तसेच न्याय हा उघड्या डोळ्यांनी करायचा असतो. न्याययदेवतेच्या हातात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देण्यात आले आहे,” असा टोलाही त्यांनी संजय राऊतांना लगावला.