अमित ठाकरेंसाठी मुंबईतील प्राईम मतदारसंघ, तरी पुतण्या विरोधात उमेदवार टाळण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य संसदीय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मनसे नेत्यांनी अमित यांना माहिममधून रिंगणात उतरवण्याचा आग्रह धरला. आता राज ठाकरे यांच्यावर निर्णयावर अमित यांची उमेदवारी अवलंबून आहे.

उपकारांची परतफेड
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटाचेही अमित ठाकरेंच्या उमेदवारीकडे लक्ष आहे. कारण अमित ठाकरे यांना मनसेने माहिममधून विधानसभेचं तिकीट दिलं, तर उद्धव ठाकरे पुतण्याविरोधात उमेदवार देणार नसल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे वरळीतून पहिल्यांदा निवडणूक लढवत होते, त्यावेळी ‘राज काकांनी’ दिलदारी दाखवत विरोधात उमेदवार दिला नव्हता. आता हेच औदार्य ‘उद्धव काका’ अमितच्या बाबतीत दाखवत नातं जपण्याचे संकेत मिळत आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असं राज २०१९ मध्ये म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंची इमोशनल स्ट्रॅटेजी
यामागे ठाकरेंची इमोशनल स्ट्रॅटेजी असल्याचंही दिसून येतं. नात्यांच्या पडद्याआड राजकीय पदरही आहे. माहिममध्ये शिवसेना (शिंदे गट) विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला नाही, तर सरवणकर विरुद्ध अमित अशी थेट लढत होईल. त्यामुळे मतविभाजन टळून अमित ठाकरेंच्या विजयाचा मार्गही सुकर होईल, आणि सरवणकरांना पाडण्याचे उद्दिष्ट्यही साध्य होईल.

दुसरीकडे, वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे असतील आणि शिवसेना-भाजप महायुतीने वरळीपुरता मनसेला पाठिंबा द्यायचा ठरवला, तर मनसेवर भावनिक दबाव निर्माण होऊन आदित्य ठाकरेंच्या विरोधाची धार कमी करण्याचा आणि आदित्य यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *