लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर ।। मध्य प्रदेशच्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरलेली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरू शकणारी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती आली आहे. दिवाळी बोनस आणि पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. निवडणूक आयोगाने ही योजना तात्पुरती बंद केली आहे.

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. याद्वारे महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात होते. यासाठी आतापर्यंत जवळपास २.४ कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते. यातच शिंदे सरकारने दिवाळी बोनसही जाहीर केला होता. याबरोबरच पुढील महिन्याचे पैसेही दिले जाणार होते. याची महिला वाट पाहत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक काळात या योजनेचे पैसे पाठविण्यावर बंदी आणली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या काळात मतदारांना थेट प्रभावनित करणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशांनंतर महिला व बाल कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेचा पैसा रोखला आहे. यामुळे पुढील दोन महिने या योजनेचे पैसे महिलांना मिळणार नाही. यामुळे आता या महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची वाट पहावी लागणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली होती. त्यांना प्राप्त झालेल्या माहितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ दिला जात असल्याचे समोर आले होते. यामुळे या योजनेची विस्तृत माहिती मागविण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच या योजनेचा पैसा रोखण्यात आल्याचे विभागाने निवडणूक आयोगाला कळविले आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.

दिवाळी बोनसचे काय?
लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या तोंडावर खूश करण्यासाठी शिंदे सरकारने दिवाळी बोनसची घोषणा केली होती. याद्वारे ३००० रुपयांचा बोनस दिला जाणार होता. परंतू, निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर लाडक्या बहिणीला आता हा दिवाळी बोनस मिळणार नाही. तसेच डिसेंबरमध्ये दिवाळी बोनस मिळेल की नाही याची काहीही शाश्वती नाहीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *