Assembly Election : भाजपच्या पहिल्या यादीत कसबा नाहीच ; भाजप धंगेकरां समोर मैदानात कोणाला उतरवणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातील कसबा मतदारसंघाचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश नाही. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मैदानात असतील, त्यांच्याविरोधात भाजप कुणाला मैदानात उतरवणार? याची चर्चा पुण्यात सुरु आहे. रविवारी भाजपने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली. पण भाजप पहिल्या यादीत कसबा विधानसभा उमेदवार घोषित नाही. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जिंकला आहे.

भाजपकडून कोण कोण इच्छूक?
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली, पण त्यात भाजपसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही याचे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूकीत महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली होती. ते पुन्हा इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे सुद्धा कसब्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल यांचे नाव देखील इच्छुक म्हणून घेतले जाते.

इच्छुक संख्या आणि पोटनिडणुकीत झालेला पराभव यामुळे भाजप कासब्यात कोणता डाव खेळणार हे पाहव लागेल. सकल ब्राह्मण समाजाने या मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्या अशी मागणी भाजपकडे केली आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच यादीत कसब्याचा उमेदवार ठरायचा, मात्र काल आलेल्या भाजप उमेदवार यादीत नाव नसल्याने चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे कसब्याचा उमेदवार कोण याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

खडकवासला, कॅंटोन्मेंटमध्ये उमेदवार नाहीच
खडकवासला आणि पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने विद्यमानांमध्ये धाकधूक वाढली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत.तेथील उमेदवारीची घोषणा पहिल्या यादीत झाली नाही. तर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातही सुनील कांबळे हे भाजपचेच विद्यमान आमदार असतानाही तेथेही तशीच स्थिती आहे. वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये अजित पवार यांचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे हे मतदारसंघ दादाकडे जाणार की भाजप यामधील एक मतदारसंघ घेणार याकडे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *