महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, आरोग्यासाठी त्यांचा अनेक प्रकारे लाभ होत असतो. मेथीची पाने थोडी कडवट चवीची असल्याने काही लोकांना ही भाजी आवडत नाही. मात्र, शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ घालून केलेली ही भाजी बहुतांश घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते. अर्थात, केवळ चवीसाठी नव्हे, तर विविध प्रकारच्या आरोग्यलाभासाठी ही बारा महिने उपलब्ध होणारी भाजी गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मेथीच्या भाजीच्या नियमित सेवनाचे हे काही लाभ… मेथीची पालेभाजी आपली पचनशक्ती वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही रोज मेथीची भाजी खाल्ली, तर पचनाच्या समस्या अगदी सहज दूर होतील. या भाजीत असे काही गुणधर्म आहेत, जे हार्ट अॅटॅक आणि हार्ट फेल्युअरसारख्या समस्यांपासून दूर राहतात. मेथीची पाने खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडते, ज्यामुळे तुम्ही सहज निरोगी राहता. जर तुम्ही रोज मेथीची भाजी खाल्ली, तर तोंडातील सर्व समस्या दूर होतात आणि श्वासाची दुर्गंधी दूर होईल. आता थंडीचे दिवस सुरू होत आहेत. हिवाळ्यात शरीर ऊबदार ठेवण्यासाठीही मेथी गुणकारी ठरते. आजार बरे करण्याबाबत बर्याच अंशी मेथीचे गुण दालचिनीसारखे असतात. विशेषतः मधुमेधावर मेथीचे सेवन गुणकारी ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे रोज मेथीची भाजी खाण्याचा प्रयत्न करा, असे तज्ज्ञ सांगतात.