Gold-Silver Price: सणासुदीच्या सुरुवातीला सोन्या ,चांदीने रचला इतिहास ; भाव गगनाला भिडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। सोन्या आणि चांदीच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरूच आहेत. सणासुदीचे दिवस सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी वाढते ज्याचे परिणाम किंमतीवर होतात तर आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेही सोने-चांदीची झळाळी वाढते. सोमवारी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीने विक्रमी उच्चांकावर झेप घेतली आहे. अशा स्थितीत, आता धनत्रयोदशी आणि दिवाळीला ग्राहकांना खरेदीसाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

सोन्याची ऐंशी पार चांदी बनली लखपती
राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ७५० रुपयांनी वाढून ८०,६५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर पोहोचला तर चांदीचा भावही पाच हजार रुपयांनी वाढून आतापर्यंतच्या विमराई उच्चांकावर पोहोचला, ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने (ibja) ही माहिती दिली. अशाप्रक्रारे, सलग चौथ्या दिवशी चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्यासह चांदीने ५,००० रुपयांनी उसळी घेत प्रति किलो ९९,५०० रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला तर शुक्रवारी चांदीचा भाव ९४,५०० रुपयांवर क्लोज झाला होता.

चांदीतील बंपर तेजीचे कारण काय
औद्योगिक मागणी आणि सोन्याची वाढ चांदीच्या बाजारातील सततच्या वाढीचे मुख्य कारण असल्याचे कमोडिटी एक्स्पर्ट्सचे मत आहे. चांदीमधील तेजी भविष्यातही मजबूत दिसत असून त्यांनी म्हटले की गुंतवणूकदार या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहतील त्यामुळे, येत्या सत्रात चांदीला चांगली मागणी मिळेल. सणोत्सव आणि आगामी लग्नसराईसाठी देशातील बहुतांश शहरांच्या सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढू लागली असून सणासुदीतील मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे ज्वेलर्सचे म्हणणे आहे.

सोन्याची विक्रमी मुसंडी
याशिवाय ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने ७५० रुपयांनी वाढून ८०,२५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर उसळले आहेत. सणासुदीचा काळ आणि लग्नाच्या हंगामात वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सच्या खरेदीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच शेअर बाजारातील घसरणीसह परदेशी बाजारातील सकारात्मक कल यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली.

वायदे बाजारातही सोन्या-चांदीत तेजीची हिरवळ
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर सोन्याचा वायदा ४९३ रुपयांनी वाढून ७८,२४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला तर सोमवारी व्यवहारादरम्यान सोन्याचा भाव ५९१ रुपयांनी वाढून ७८,३४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. त्याचवेळी, डिसेंबर चांदीचा वायदा भाव २,८२२ रुपयांनी वाढून ९८,२२४ रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर पोहोचला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स सोन्याचे फ्युचर्स ०.५२% वाढून २,७४४.३० डॉलर्स प्रति औंस झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *