महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीचा फराळ महागणार असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवानंतर खाद्यतेलाच्या दरात झालेली वाढ अजूनही कायम असून याचा फटका सामान्यांना बसणार आहे.
दिवाळी म्हणजे फराळ हे समीकरण ठरलेले आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार फराळाचे पदार्थ बनवित असतो. यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. सर्वाधिक वापरले जाणारे सोयाबीन असो वा सनफ्लॉवर, राइस ब्रान आणि शेंगदाणा तेल असो, या सर्वांचे दर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती खाद्यतेल विक्रेत्यांनी दिली. यासंदर्भात अधिक सांगताना खाद्यतेलाचे ठोक विक्रेते दत्तात्रेय येनूरकर म्हणाले, ‘गणेशोत्सव संपेपर्यंत खाद्यतेलाचे दर काहीसे आवाक्यात होते. गणेशोत्सव संपत नाही तोच प्रति डब्यामागे जवळपास ४०० रुपयांची वाढ झाली. सोयाबीनचा प्रति डबा दर १,७५० रुपये होता. त्यात अचानकपणे वाढ होऊन सोयाबीन तेल आता २,१५० रुपये प्रति डबा दराने विकले जात आहे. हीच स्थिती इतर खाद्यतेलांच्या बाबतीत आहे. तेव्हापासून वाढलेले दर अद्याप कमी झालेले नाहीत. परिणामत: दिवाळीत दरवर्षी उडणारा खाद्यतेलाचा भडका यंदाही कायम आहे.’
निवडणुकीनंतर या दरांमध्ये अजून वाढ होईल, असेदेखील काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर काहींनी दिवाळीला अद्याप आठवडा शिल्लक असून या कालावधीत खाद्यतेलाचे दर काहीसे कमी होण्याची धूसर शक्यता व्यक्त केली आहे.
प्रति डबा भाव असे…
सोयाबीन : २,१५०
शेंगदाणा : २,४००
सनफ्लॉवर : २,१००
राइस ब्रान : २,१००
तीळ : २,६५०