महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८जानेवारी | निवडणुकांचे निकाल लागण्याआधीच “मुंबईसह 26–27 महापालिका जिंकणार” असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत संतापले आहेत. सामनामधील ‘रोखठोक’ या सदरातून राऊतांनी फडणवीसांवर थेट शब्दांचे आसूड ओढले असून, हा आत्मविश्वास नसून “अफाट पैसा आणि सत्तेचा माज” असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक म्हणजे लोकशाही उत्सव की सत्ताधाऱ्यांचा ठरलेला कार्यक्रम, असा सवाल उपस्थित करत राऊतांनी संपूर्ण प्रक्रियेवरच संशयाची सुई रोखली आहे.
राऊत म्हणतात, मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांत हरामाचा पैसा ओसंडून वाहिला. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांकडे अमाप पैसा होता आणि त्याच पैशांच्या जोरावर निवडणुका ‘मॅनेज’ करण्यात आल्या. गौतम अदानींवर राज ठाकरे यांनी केलेल्या हल्ल्याने भूकंप झाला, पण त्या भ्रष्ट पैशांवर भाजपने थेट “मुंबई अदानींच्या घशात घातली,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला. ही निवडणूक नव्हे, तर पैशांची आणि सत्तेची लढाई होती, असा त्यांचा ठाम दावा आहे.
“मुंबईवर शिवसेनेची 23 महापौरांची परंपरा होती. कडवट मराठी महापौरांनी मुंबई सांभाळली,” असं सांगत राऊतांनी मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आणला. मराठी माणसाचा पराभव हा बाहेरच्यांनी नाही, तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, अमित साटम यांच्यासारख्या मराठी नेत्यांनीच घडवून आणला, असा घणाघात त्यांनी केला. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना साथ दिल्यामुळे “या निवडणुका होत्या की आयोगाने केलेल्या नेमणुका?” असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
निकालाआधीच “200 जागा जिंकू” असे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांवर टीका करत राऊत म्हणाले, हा आत्मविश्वास विकासकामांचा नाही, तर यंत्रणा, पैसा आणि दबावतंत्राचा आहे. मराठी भागांत मतदारांची नावे वगळणे, बोटावरील शाई पुसली जाण्याच्या तक्रारी, मंत्र्यांचेच नाव यादीत नसणे – या सगळ्या घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले. “ही भाजपची लहर नाही, तर भ्रष्ट पैशांचा कहर आहे,” असा निष्कर्ष काढत राऊतांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. आता या जहरी टीकेला भाजप काय उत्तर देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
