![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८जानेवारी | सोनं-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्का देणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असून, अवघ्या एका आठवड्यात सोनं प्रति तोळा ₹३३२० ने महागलं आहे. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण आला आहे. २४ कॅरेट सोन्याबरोबरच २२ कॅरेट सोन्याचे दरही तब्बल ₹३०५० ने वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होताना दिसतो आहे.
सध्या देशात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,४३,९३० वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ४६०३.५१ डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, व्याजदरातील बदल आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरांना जोरदार आधार मिळतो आहे. मागील आठवड्याभरातच सोन्याने उच्चांक गाठत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहरनिहाय पाहिले, तर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांत २४ कॅरेट सोन्याचे दर ₹१,४३,७८० प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. मुंबईत २२ कॅरेट सोनं ₹१,३१,८०० दराने मिळत आहे. पुण्यातही दर जवळपास याच पातळीवर असून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर ₹१,४३,९३० असून २२ कॅरेट सोनं ₹१,३१,९५० प्रति तोळा या दराने विक्री होत आहे. म्हणजेच देशभरात सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं चित्र आहे.
सोन्यापाठोपाठ चांदीनेही उसळी घेतली आहे. मागील एका आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल ₹३५,००० प्रति किलोची वाढ झाली असून, सध्या चांदीचा दर ₹२,९५,००० प्रति किलो इतका झाला आहे. विशेष म्हणजे २०२६ या वर्षात आतापर्यंत चांदीचे दर सुमारे २२.४ टक्क्यांनी वाढले आहेत. अमेरिकेत महागाई कमी झाल्यानंतर फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी, पुढील काळातही मौल्यवान धातूंचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
