![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८जानेवारी | पुणेकरांनो, 19 जानेवारीला अलार्म लावण्याची घाई करू नका! शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026’ सायकल स्पर्धेमुळे प्रशासनाने थेट ब्रेकच लावला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे शहरातील प्रमुख भागांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एवढंच नाही, तर कार्यालयांनीही शक्य असल्यास सुटी द्यावी किंवा वर्क फ्रॉम होम, मेट्रो व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे स्पष्ट संकेत पुणे पोलिसांनी दिले आहेत. म्हणजे सोमवारी पुणे शहर अभ्यासापेक्षा ‘सायकलिंग इव्हेंट’साठी सज्ज असणार आहे.
19 ते 23 जानेवारीदरम्यान पुण्यात ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा रंगणार असून, 19 जानेवारीला विशेष सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. हे दोन रस्ते म्हणजे पुण्याच्या वाहतुकीची ‘नस’ – आणि तीच नस काही तासांसाठी दाबली जाणार! त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नोकरदारांची होणारी अडचण लक्षात घेऊनच प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान, ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ या स्पर्धेचं महत्त्व केवळ वाहतूक बदलापुरतं मर्यादित नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेला भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा क्रीडा आणि पायाभूत वारसा असल्याचं म्हटलं आहे. पुणे हे केवळ सांस्कृतिक राजधानी नाही, तर आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. पश्चिम घाटाचं निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक किल्ले आणि आधुनिक पायाभूत सुविधा – या सगळ्यांचं दर्शन या स्पर्धेच्या निमित्ताने जगाला होणार आहे.
जगातील किमान 35 देशांमधून आलेले सायकलपटू, प्रशिक्षक आणि अधिकारी पुण्यात दाखल झाले असून, अवघ्या कमी कालावधीत 437 किलोमीटरचे रस्ते जागतिक दर्जानुसार विकसित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेगवान तयारीचं विशेष कौतुक करत, ‘यूसीआय’च्या इतिहासात हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. थोडक्यात काय, 19 जानेवारीला पुणे शहरात पुस्तके आणि फाइल्सपेक्षा सायकलच जास्त धावणार आहेत. सुट्टीचा आनंद घ्या, पण रस्त्यावर पडण्याआधी ट्रॅफिक अपडेट पाहायला विसरू नका!
