![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८जानेवारी | पुणेकरांसाठी दिलासादायक आणि आश्वासक बातमी आहे. माण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक) या १९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची चाचणी अखेर यशस्वी झाली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतलेल्या या चाचणीमुळे आता “मेट्रो कधी?” हा प्रश्न “मेट्रो येतेय!” या उत्तरात बदलतो आहे. मार्चअखेरपर्यंत शिवाजीनगरपर्यंतचा मार्ग पूर्ण करून प्रवाशांसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुण्याचा तिसरा मेट्रो मार्ग लवकरच प्रत्यक्ष प्रवासात उतरणार आहे.
माण–हिंजवडी ते शिवाजीनगर असा तब्बल २३ किलोमीटर लांबीचा हा पूर्णपणे एलिव्हेटेड मेट्रो मार्ग आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सुरू झालेलं काम आता अंतिम टप्प्यात आहे. २३ पैकी १९ किलोमीटर मार्गावर यशस्वी चाचणी झाली असून उर्वरित सुमारे पाच किलोमीटरचं कामही मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. काही मोजकी स्टेशन वगळता संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असल्याने, पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
बाणेर, पाषाण आणि हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांची कायमची डोकेदुखी. आयटी हब असलेल्या हिंजवडीकडे जाण्यासाठी तासन्तास गाडीत बसून राहणं हीच जणू ‘नोकरीची दुसरी शिफ्ट’ झाली होती. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून इंधन बचत, प्रदूषणात घट आणि मानसिक ताण कमी होणार आहे. मार्चनंतर माण ते हिंजवडी मेट्रो सुरू झाल्यावर हजारो नोकरदारांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे.
या प्रकल्पाचा भाग असलेल्या आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपुलामुळेही काहीसा दिलासा मिळाला आहे. खालच्या स्तरावर वाहतूक आणि वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका अशी ही रचना आहे. औंध ते शिवाजीनगर दिशेचा रस्ता खुला झाल्याने त्या मार्गावरील कोंडी कमी झाली आहे. मात्र शिवाजीनगरहून औंध, बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकूणच काय, मेट्रोची ही यशस्वी चाचणी म्हणजे पुण्याच्या वाहतुकीच्या भविष्यासाठी आशेचा हिरवा कंदीलच आहे!
