महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतर पाऊस आता राज्यातून माघारी फिरत आहे. आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज कोरडे वातावरण असेल तर महाबळेश्वर, पुण्यातील घाटमाथ्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी आणि कोल्हापूरमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या माघारीनंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. दिवळीनंतर राज्यात थंडीची हुडहुडी भरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (maharashtra weather news in marathi)
२८ आणि ३० ऑक्टोबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले होते. रात्री पाऊस आणि दिवसा उकाडा यामुळे घामाच्या धारा निघत होत्या. राज्यात अजूनही उकाडा पूर्णपणे गेलेला नाही. सायंकाळपासून पहाटेपर्यंतच थंड वाऱ्याची हलकी झुळूक जाणवते. दिवसा मात्र अजूनही उकाडाच आहे. त्यामुळे सारेच थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. एक नोव्हेंबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. (Maharashtra weather update News in Marathi)
मुंबई शहर आणि उपनगरात आज हवामान कोरडे आणि निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान ३३°c तर किमान तापमान २५.५°c च्या आसपास असेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे या कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात आज हवामान ढगाळ असेल. पुणे शहराचे कमाल तापमान ३२ अंशसेल्सिअस असेल. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही हवामान कोरडे राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. पण थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान तापमानामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळणार आहे. दिवळीनंतर राज्यात थंडीची हुडहुडी भरेल. दिवाळीमध्ये पाऊस पूर्णपणे माघार गेलेला असेल अन् राज्यात थंडीची चादर पसरलेली दिसेल. राज्यात एक नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल.