महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. १ ऑगस्ट -महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना आता कागदी वीज बिल पोहचण्यापूर्वीच आपले वीज बिल समजणार आहे. वीज बिल जनरेट झाल्यानंतर त्याची प्रिंटिंग होऊन वाटप होण्यास बराच वेळ लागतो. त्यापार्श्वभूमीवर वीज बिल जनरेट झाल्यानंतर सदर माहिती संबंधित वीज ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलकर फोन कॉल आणि एसएमएसने देण्याचा प्रयोग महावितरणने सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेत वीज बिल मिळाल्याने त्याचा भारणाही वेळेत होऊ शकणार आहे.
महावितरणचे राज्यात एक कोटी 80 लाख घरगुती वीज ग्राहक असून त्यांनी कापरलेल्या विजेचे प्रत्येक महिन्याला रिडींग घेऊन बिले द्यावी लागतात. सदर बिले वेळेत न पोहचल्यास किंवा ग्राहकाला काही शंका असेल तर त्याचा भरणा केला जात नाही. त्यामुळे वीज बिल तयार होताच ते ग्राहकापर्यंत पोहचण्याआधी त्याची आगाऊ माहिती ग्राहकाला फोन कॉल आणि एसएमएसने देण्यात येणार आहे.
गेल्या चार दिवसात 86 हजार ग्राहकांना संपर्क साधला आहे. त्यापैकी 77 टक्के ग्राहक आपल्या बिलाबाबत समाधानी आहेत. सध्या ग्राहक काढीव वीज बिले आल्याच्या तक्रारी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे हाच चांगला उपाय असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
