२०२०आयपीएलमध्ये नियमांचे पालन, सपोर्ट स्टाफमध्ये कात्री बसण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. १ ऑगस्ट -टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असला तरी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बीसीसीआयसह आयपीएल समितीलाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. खेळाडूंना एकत्र करणे, सराव, त्यांची विमान व्यवस्था, यूएईतील राहण्याची व्यवस्था, हॉटेल व स्टेडियममधील सुरक्षा व आरोग्याची काळजी, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या सर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. यामुळेच कदाचीत आगामी आयपीएलमध्ये संघ मालकांची पसंती फक्त खेळाडूंनाच असणार आहे. त्यामुळे सपोर्ट स्टाफमध्ये कात्री बसण्याची शक्यता यावेळी निर्माण झाली आहे. ड्रेसिंग रूममध्ये सामाजिक अंतर पाळले जावे, तेथे कमीत कमी व्यक्ती असाव्यात यासाठी हे पाऊल उचलण्यात येऊ शकते.

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ सर्वात आधी यूएईत दाखल होणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा संघ 10 ऑगस्ट रोजी तिथे जाण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी यूएईत जाईल. काही संघ 25 ऑगस्टदरम्यान यूएईकडे रवाना होणार आहेत.

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या संख्येत कपात करता येणार नाही. यासाठी आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया संघांतील खेळाडू दोन महिने यूएईत वास्तव्य करणार आहेत. अशा प्रसंगी नेटमध्ये गोलंदाजी करणारे खेळाडूही मोठय़ा प्रमाणात असायला हवेत. यासाठी खेळाडूंऐवजी सपोर्ट स्टाफला कात्री देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आयपीएलदरम्यान एका संघामध्ये 25 ते 28 खेळाडू असतात तसेच त्यांच्यासोबत 10 ते 15 सपोर्ट स्टाफ सदस्य असतात. काही अधिकारी यामध्ये समाविष्ट केले जातात. आगामी स्पर्धेत खेळाडूंची संख्या कमी करून 20वर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, पण काही संघ मालकांनी खेळाडूंच्या संख्येत कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही संघ मालकांकडून याबाबतचा अंतिम निर्णय कोच व संघ व्यवस्थापन घेईल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *