रसिक चिंचवडकर दिवाळी पहाटेतील सुरसंगीताने मंत्रमुग्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ नोव्हेंबर ।। चिंचवड ।। चिंचवड येथील भोईर नगर येथे कै. मनिषा भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने येथे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी मराठी भावगीते आणि हिंदीतील गीतांना आपल्या दमदार आवाजाचा साज देत सादर केले. सुमारे तीन तासांच्या या मैफलीतील अविट गाण्यांना वाद्यवृंदातील कलाकारांनी दिलेल्या साथसंगीताने उपस्थित चिंचवडकर रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. दरम्यान, कै.मनिषा भोईर ट्रस्ट च्या हर्षवर्धन भोईर यांनी कलाकारांचे अभिनंदन करुन उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांचे अभीष्टचिंतन केले.

पहाटे पाच वाजता राग भूपाळीतील बासरीच्या स्वरांनी ‘दिवाळी पहाट’ची चैतन्यमयी सुरुवात झाली. पाठोपाठ शास्त्रीय बासरी वादनाने त्यात भर टाकली. शास्त्रीय गायक अजिंक्य देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘सूर निरागस हो…’ आणि गायिका राधिका अत्रे यांच्या ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी…’ या अभंगास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत कलाकारांचा उत्साह वाढविला. स्वरा देऊळगावर यांनी गोड आवाजात सादर केलेल्या ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ ने उपस्थितांनी मने जिंकली.

दरम्यान, या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत गेली. गायक अजिंक्य देशपांडे, राधिका अत्रे, सार्थक भोसले, हिम्मतकुमार पंड्या, मधुसूदन ओझा, मानसी घुले यांनी मराठी हिंदी गाण्यांना सादर केले. सार्थकने देवाचिये व्दारी, उभा क्षणभरी… ;हिम्मतकुमारने दमदार आवाजात शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी… ; स्वराने पद्म नारायणा… तर मधुसूदन यांच्या विठ्ठल नामाचा रेटा हो…ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मानसी भोईर यांनी घर आजा मोरे परदेसियाचा अंतरा सादर करताना तिला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. पिया बोले पिया बोले… मानसी आणि अजिंक्यने सूरतालात सादर केले. सकाळची चाहूल लागत असताना राधिकाच्या आवाजातील पैल तो गे काऊ कोकताहे… या गाण्याने रंगत आणली. त्यानंतर सार्थकने पाहिले न मी तुला… ; शिर्डीवाले साईबाबा, तूही फकीर… ; ही चा तुरू तुरू, तुझे केस भुरू भुरू… ; बहरला हा मधुमास…. ; तुझ्या ऊसाला लागल कोल्हा…. ; ओ परदेसिया… आणि रसिक प्रेक्षकांचा दिवाळीचा जल्लोश शिगेला पोचविणारे हिम्मतकुमारच्या खड्या आवाजातील माऊली, माऊली…. गाण्याने रसिकांसाठी आयोजित दीवाळी पहाट संस्मरणीय झाली. या गुणी कलाकारांच्या गायनाला ढोलकीवर साथ दिली हर्षद गणबोटे यांनी तर कीबोर्ड प्रकाश सुतार आणि तबल्याची साथसंगत गोविंद कुडाळकर यांनी केली. सूत्रसंचालन मधुसूदन ओझा यांनी केले.

दरवर्षी कै.मनिषा भोईर ट्रस्ट तर्फे दरवर्षी दिवाळीच्या दिवशी ‘दिवाळी पहाट’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला जातो. या निरंतर प्रथेप्रमाणे आजही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास परिसरातील नागरिकांकडून नेहमीप्रमाणे यावर्षी देखील भरभरून प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *