महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे नकारच दिल्याचे चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रणनीतीविषयी विचारुनही त्यांनी परस्पर उमेदवार उभे केले, अशी खंत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली. माहीममध्ये शिवसेना कार्यकर्ते निवडणूक लढण्यास आक्रमक आहेत, असं सांगत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे मागे हटण्यास नकार दिला. काल माहीममधील शिवसेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकरही उमेदवारीवर ठाम असल्याचं म्हणाले होते. त्यामुळे माहीममधून पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्यासोबत होते. आमचं बोलणं झालं होतं. मी त्यांना विचारलं होतं, की तुमची काय रणनीती आहे? तर ते म्हणाले की शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं होऊ द्या. त्याच्यानंतर आपण बोलुयात. पण त्यांनी परस्पर उमेदवार उभे केले, असं शिंदे म्हणाले.
माहीम मतदारसंघातील आमचा उमेदवार सदा सरवणकर हे दोन-तीन वेळा आमदार राहिले आहेत. ते जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी मी बोललो. मात्र निवडणूक लढण्याबाबत त्यांचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. त्यांचाही विचार केला पाहिजे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी माघार घेण्यास नकारात्मकता दर्शवली.
सरवणकरही ठाम
मनसेकडून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे रिंगणात असल्यामुळे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, असं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलं आहे. परंतु सरवणकरांनी या शक्यता धुडकावून लावल्या होत्या. मी वर्षा बंगल्यावर गेलो, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली नाही, असं सरवणकर म्हणाले होते. ज्याचा एकही आमदार नाही, त्याने मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणं हे किती हास्यास्पद आहे, असा टोलाही यावेळी सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. उलट कौटुंबिक स्नेह संबंधांमुळे उद्धव ठाकरेच त्यांचा उमेदवारच माघार घेईल, अशी शक्यताही सरवणकर यांनी बोलून दाखवल