पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० गाड्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीसाठी महापालिकेकडून विजेवर धावणाऱ्या ५०० गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढणार असून प्रवाशांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील किमान १० लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. त्या तुलनेत पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने स्वयंसेवी संस्था, प्रवासी संस्थांकडून होत होती. ही बाब लक्षात घेऊन पुढील वर्षभरात नव्याने ५०० गाड्या खरेदी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पीएमपी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत काही गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीतही मंजूर झाला असून, गाड्या खरेदीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून, १७७ गाड्यांची खरेेदी पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या विजेवर धावणाऱ्या ४७३ गाड्या आहेत. येत्या काही दिवसांत १७७ गाड्या दाखल होणार असून त्यामुळे ही संख्या ६५० एवढी होणार आहे. त्यामध्ये नव्याने घोषणा केल्याप्रमाणे ५०० गाड्यांची भर पडणार आहे. प्रस्तावित ५०० गाड्यांमध्ये १०० गाड्या विजेवर धावणाऱ्या, तर ४०० गाड्या सीएनजीवरील असतील, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

रस्ते विकसनाबरोबरच सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणालाही महापालिकेने प्राधान्य दिले आहे. पीएमपीसाठी एकूण ४८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच पीएमपीच्या सुतारवाडी आणि निगडी या आगारांमध्ये ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्त्वावर आगारांचे व्यापारी विकसन करण्यात येणार आहे. त्यातून पीएमपीला उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. तसेच विविध आगारांमध्ये आणि पीएमपीच्या स्वमालकीच्या मिळकतींवर ई-चार्जिंग स्टेशनही उभारण्याचे नियोजित आहे. त्यामुळे विजेवर धावणाऱ्या गाड्या ताफ्यात आल्यानंतर त्यांच्या चार्जिंगचीही सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *