जरांगेंनी निवडणुकीतून घेतली माघार! म्हणाले, ‘मराठा बांधवांनी त्यांचे सर्व…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ नोव्हेंबर ।। मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आपण माघार का घेत आहोत हे सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.

…म्हणून निवडणूक लढणार नाही
विधानसभा निवडणुकीमधून माघार घेण्याची आजचा (4 नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. एकीकडे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे सर्वच पक्ष कसून या निवडणुकीच्या प्रचारासाठी तयारी करत आहेत. असं असतानाच मनोज जरांगे यांनी कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी दिली जाणार आहे, हे जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून सपशेल माघार घेतली आहे. आपण निवडणुकीतून का माघार घेत आहोत हे सांगताना, “एका जातीवर लढणे आणि जिंकणे शक्य नाही,” असं जरांगेंनी समर्थकांना सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना जरांगेंनी, ‘मराठा बांधवांनी त्यांचे सर्व अर्ज मागे घ्यावेत, एकही अर्ज ठेवू नका,” असं जरांगेंनी म्हटलं आहे. “आपल्याला आता निवडणूक लढायची नाही,” असं जरांगेंनी जाहीर केलं आहे. “मित्र पक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत,” असं जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, जरांगेंनी मतदारसंघ ठरले होते मात्र उमेदवार ठरले नव्हते असं म्हटलं आहे. “मतदारसंघ ठरले होते. फक्त नावं ठरायची होती. ही माघार नाही गनिमी कावा आहे,” असं जरांगे म्हणाले. तसेच “समाजाची आठवण येत असताना रविवारी बोलताना डोळ्यात पाणी येत होतं,” असंही जरांगेंनी सांगितलं.

पाडापाडीची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण
“याला पाडा आणि त्याला पाडा ही आपली भूमिका नाही,” असंही जरांगेंनी यावेळेस स्पष्ट केलं आहे. “कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा,” असं जरांगेंनी म्हटलं आहे. यापूर्वी रविवारी पत्रकारांशी बोलताना, जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार व्यक्त केलेला. उमेदवार पाडण्याचा निर्धार ज्या मतदारसंघांसाठी करण्यात आला होता त्यामध्ये संभाजीनगरमधील गंगापूर, हिंगोलीमधील कळमनुरी आणि जालन्यातील भोकरदन मतदारसंघांचा समावेश होता. मात्र आता जरांगेंनी, “मी कुणाला पाडा, कुणाला निवडून आणा असं काहीही सांगत नाही,” असं जरांगेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *