Maharashtra Election 2024: आजपासून राजकीय दिवाळी ; सभा, बैठकांचे आयोजन, स्टार प्रचारकही मैदानात उतरणार शाब्दिक फटाके फुटणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ नोव्हेंबर ।। दिवाळीतील भाऊबीजेनंतर आज, सोमवारपासून आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे फटाके फुटणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सभा आणि बैठकांचा नारळ सोमवारी फुटणार आहे. स्टार प्रचारकही प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रमुख नेत्यांवर प्रचाराची धुरा असेल.

येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईसह राज्यातील अनेक मतदारसंघांत मित्रपक्ष परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनधरणी आणि बैठकांच्या सत्रात राजकीय पक्षांची नेते मंडळी व्यग्र असतानाच आता सोमवारपासून मैदानी प्रचाराची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी रविवारी कुर्ला मतदारसंघात सभा घेतल्यानंतर सोमवारी त्यांच्या सभांचा धडाका कायम असणार आहे. तर उद्धव ठाकरे हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर असतील. तेथे ते सभा घेणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवादही साधतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा मंगळवारपासून कोल्हापूर येथे होणाऱ्या महायुतीच्या सभेत सहभागी होणार आहेत. मनसेचे राज ठाकरे यांच्याही सोमवारी दोन सभा होणार आहेत. डोंबिवली येथील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासाठी डोंबिवली येथे, तर ठाण्यातील अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ ठाण्यात सभा होईल. अजित पवार हे सोमवारी बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. ते दिवसभर मतदारसंघातच ठाण मांडून असतील.

रविवारचा मुहूर्त साधला
दिवाळीच्या सुट्टीमुळे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला अद्याप वेग आलेला नाही. मात्र रविवारी सुट्टीचा योग साधून अनेक उमेदवार मॉर्निंग वॉक, इमारतींच्या बैठका आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचवेळी अनेक उमेदवारांनी थेट दिवाळी फराळाच्या निमित्ताने एकत्र येत प्रचाराची रंगत वाढविली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *