महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ४ ऑगस्ट – मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार, अविनाश जाधव यांची पोलीस कोठडी वाढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अविनाश जाधव यांना कापूरबावडी पोलीसांनी अटक केल्यानंतर मनसेचे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनबाहेर उपस्थिती लावली होती. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर लगेच राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत अविनाश जाधव यांच्याविषयी सखोल चर्चा झाली असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंची भेट घेऊन निघताना बाळा नांदगावकरांना राज ठाकरेंनी एक निरोप अविनाश जाधव यांना द्यायला सांगितला, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
बाळा नांदगावकर फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, अविनाशला अटक झाली व तडीपार ची नोटीस देण्यात आली. त्या अनुषंगाने आज सकाळी लोकमान्य पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करून राज ठाकरेंकडे गेलो. तिथे अविनाश विषयी सखोल चर्चा झाली व राज ठाकरेंच्या निर्देशानुसार ठाणे गाठले. ठाणे येथे संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
राजकारणात विविध पक्ष असतात पण तुम्हाला माहीतच आहे आपला “मनसे परिवार” आहे, आणि परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवार च ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद लाऊन उभा असतो आणि आपले परिवार प्रमुख राज ठाकरे हे सर्व अक्षरशः सर्व कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करतात व जपतात. अविनाश बद्दल तर ही तळमळ अजून तीव्रतेने मी स्वतः आज अनुभवली. तेथून निघतांना बाकीच्या चर्चेबरोबरच राज ठाकरेंचा एकच निरोप अविनाशला दयायला सांगितला, अविनाश, मै हू ना! यात सगळेच आले.
ठाण्याला जाऊन अविनाश शी भेट झाली, व त्याला ठामपणे आम्ही सर्व सोबत आहोत व साहेबांचा विशेष संदेश सांगितला. काय ताकद असते ना केवळ तीन शब्द परंतु कार्यकर्त्यांत 100 हत्तींचे बळ येते. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा. जनतेसाठी आमचा लढा हा असाच अविरतपणे कायम राहील
दरम्यान, ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अविनाश जाधव म्हणाले की, याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे.
जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडायचं नाही का? लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
