महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली होती, तसाच काहीसा प्रकार यंदाही घडला आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या गोटात खळबळ माजू शकते.
अमित शहा काय म्हणाले?
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दिवशी आपल्याला निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, असे अमित शहा म्हणाले.
अजितदादा काय म्हणाले?
महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय अद्याप झाला नसताना अमित शहा यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे संकेत दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अमितभाईंना भाषणात तसे बोलण्याचा अधिकार आहे, असे अजितदादा म्हणाले. निवडणूक झाल्यानंतर तिन्ही पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा विषय ठरवला जाईल, असे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले.
ठाकरेंवर शहांचा निशाणा
मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले होते; परंतु शिवसेनेने जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या नेत्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार जाऊन बसले, अशा शब्दात अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.