महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। हवामान बदलामुळे संसर्गजन्य रोगांसाठी पोषक वातावरण झाले असल्याने राज्यात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. राज्यात दहा महिन्यांत मलेरियाचे १७ हजार ७७५ हजाराहन अधिक तर डेंग्यूचे १७ हजार ३८९ रुग्ण आढळले आहेत. या दोन आजारांमुळे आतापर्यंत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या अनियमित पाऊस तसेच सतत बदलणारे वातावरण यामुळे पावसाळी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये डासांच्या पैदासासाठी पोषक वातावरण असल्याचे एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात जानेवारी ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मलेरियाचे एकूण १७ हजार ७७५ रुग्ण आढळले आहेत, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ६ हजार ११९ रुग्ण आहेत आणि ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत ६ हजार ६५० तर पाच जणांचा मृत्यू, पनवेल ८१९ आणि चार मृत्यू, ठाण्यात ६५८ रूग्ण आणि एक मृत्यू, चंद्रपूरमध्ये ४३१ आणि दोन मृत्यू, रायगडमध्ये ४३९ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूचे एकूण १७ हजार ३८९ रुग्ण आढळून आले असून, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ५ हजार ७० रूग्ण आणि पाच जणांचा मृत्यू, नाशिकमध्ये १हजार १२१ रूग्ण आणि एक मृत्यू, कोल्हापूर शहरात ४७२ तर जिल्ह्यात ७०९ रुग्ण, सातारा ५०८, पालघर ५०३, नागपूर ४२७ असे रूग्ण आढळून आले आहेत.
चिकुनगुनियाचे दीड महिन्यात दुप्पट रुग्ण
राज्यातील आरोग्य विभागालाही चिकुनगुनिया टेन्शन देत आहे. राज्यात ९ नोव्हेंबरपर्यंत ५ हजार ३५, २१ सप्टेंबरपर्यंत २,१६७ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या दीड महिन्यांत दुप्पट वाढ झालेली आहे. यामध्ये नागपुरात सर्वाधिक १०६२, मुंबईत ६११, कोल्हापुरात २८१, पुणे शहर ४४२ आणि जिल्ह्यात २४७, अमरावतीमध्ये २३१ आणि अकोल्यात २३२ रुग्ण आढळले आहेत.