महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे. अमित ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच जाहीर मंचावरुन भाषण केलं. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्याप्रमाणे “जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो” असं म्हणत अमित ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. मनसेने माझं नाव जाहीर केल्यावर शिवसेनेची यादी आली, त्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं मी कसा मागे पडलो, म्हणून त्यांनीही उमेदवार दिला, असं अमित म्हणाले.
अमित ठाकरे काय म्हणाले?
जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… पहिल्यांदाच मला असं बघत असाल ना तुम्ही? आजचा दिवस कसा गेला विचारु नका, ३२ वर्षात इतका घाणेरडा दिवस आयुष्यात गेला नाही. कारण राज साहेबांची पहिली जाहीर सभा माझ्यासाठी आहे. मला त्याच्यात बोलावं लागणार आहे, ही भीती माझी नाही, मागे बसलेत त्यांची आहे.
माझ्या काकांना वाईट वाटलं
लिस्ट जाहीर झाल्यानंतर तीन तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला. त्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं मी कसा मागे पडलो. एखाद दोन दिवसात त्यांचाही उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन संदीपजींना केला, आताही संदीप देशपांडे सरांना विचारु शकता, कुठे तरी बातम्या दाखवत होते, की आम्ही वरळीमधून माघार घेतली, तर ते माहीममधून मागे हटतील, फक्त बातम्या येत होत्या, खरं खोटं माहिती नाही. पण मी संदीपजींना सांगितलं, आपण माघार घ्यायची नाही. आपण उतरलोय जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच. त्रिकोणी लढत आहे, वगैरे प्रश्न मल विचारले जात होते. त्रिकोणी नाही, माझ्यासमोर पाच सहा उमेदवार आहेत, पण सहाचे सहाशे असते, तरी मला फरक पडत नाही. माझा माहीमकरांवर विश्वास आहे, त्यांनी खूप सहन केलंय, असं अमित ठाकरे म्हणतात.