Maharashtra Weather News : राज्याचा पारा घसरला ; पहा हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। पावसानं माघार घेतली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्र सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांमुळं पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. दक्षिण महाराष्ट्रावर अद्यापही पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. उर्वरित राज्यात मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट होत आहे.

राज्याच्या उत्तरेकडील भागासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही पहाटेच्या वेळी थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली आहे. घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळतेय, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पारा चांगलाच उतरताना दिसू लागला आहे. निफाडमध्ये राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमान 12 अंशांवर पोहोचलं आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या काळात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्याचत आली आहे. याचाच थेट परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठीचं पोषक वातावरण हा त्याच परिणामांचा एक भाग. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामानाचे असेच काहीसे तालरंग पाहायला मिळणार आहेत. थोडक्यात राज्यात कुठे थंडी वाढेल तर, कुठे पाऊस.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी काही प्रमाणात गारठा जाणवेल. तर, दुपारनंतर मात्र सूर्याचा प्रकोप अडचणी वाढवताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्य़ातील हवामानाविषयीचा अंदाज पाहिला तर, इथं वातावरण कोरडं राहणार असून, सकाळच्या वेळी धुकं पडल्याचं पाहायला मिळेल. कोकणातही दिवसभर उडाका आणि रात्री, पहाटे थंडी जाणवणार आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं असेल असंही वेधशाळेकडून सूचित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *