महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या नवीन कांद्याचा दर्जा खालावला असल्याने खरेदीदारांनी मोर्चा जुन्या कांद्याकडे वळविला आहे.
मात्र, मागणीच्या तुलनेत जुन्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे प्रतिकिलोचे दर 55 ते 65 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रतिकिलोचे दर 80 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथून नवीन कांद्याची; तर जुन्नर, मंचर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. बाजारात 10 ते 15 ट्रक जुना कांदा, तर 30 ते 35 ट्रक नवीन कांदा दाखल होत आहे.
घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलोला 55 ते 65 रुपये दर मिळत आहे, तर नवीन कांद्याला 30 ते 45 पये दर मिळत आहे. जोपर्यंत चांगल्या प्रतीच्या नवीन कांद्याची बाजारात आवक वाढणार नाही तोपर्यंत हे दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारीवर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.
दक्षिण भारतातून जुन्या कांद्याला मागणी
पुणे विभागातील कांद्याला दक्षिण भारतातून कायम मागणी असते. सद्य:स्थितीतही दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू येथून कांद्याला मागणी होत आहे. दक्षिण भारतासह पुणे शहर आणि परिसरातूनही कांद्याला मागणी आहे. मध्य प्रदेशात मात्र स्थानिकचा कांदा असल्याने तेथून मागणी थांबली आहे. बाजारात दाखल होणार्या जुन्या कांद्याचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात वाढ झाली आहे.